Ad will apear here
Next
होयसळ मंदिरातील शिल्पामागचा विचार


होयसळ मंदिरे शिल्पसमृद्ध आहेत हे तर सर्वांनाच माहिती आहे; पण त्या प्रत्येक शिल्पामागेही काही विचार असतो, काही प्रयोजन असते. बेलूरच्या भव्य चेन्नकेशवाच्या मंदिराच्या प्राकारात केशवाचे दुसरे एक छोटे मंदिर आहे, जे विष्णुवर्धन राजाच्या गुणी राणीने म्हणजे शांतलादेवीने बांधवून घेतले होते. ह्या मंदिराच्या दर्शनी मंडोवरावर एक अप्रतिम शिल्प आहे. नेहमीच्या शिव, विष्णू, कृष्ण, देवी इत्यादी देव-देवतांचे हे शिल्प नाही. ह्या शिल्पात महाभारत युद्धातील एक प्रसंग चित्रित केलेला आहे. 

कौरवांकडून लढणारा प्राग्ज्योतिषपूरचा राजा, भौमासूर उर्फ नरकासुराचा पुत्र आणि दुर्योधनाचा सासरा भगदत्त. महाभारत युद्ध झाले तेव्हा हा दीडशे वर्षे वयाचा म्हातारा होता. त्याचा महाकाय हत्ती सुप्रतीक आणि पांडव वीर भीमसेन ह्यांच्यामध्ये भारतीय युद्धाच्या बाराव्या दिवशी युद्ध झाले. तो प्रसंग ह्या शिल्पात कोरलेला आहे. 

श्रीधर स्वामींनी ‘पांडवप्रताप’ ह्या आपल्या काव्यमय ग्रंथात ह्या प्रसंगाचे मोठे सुरेख वर्णन केलेले आहे. 

तों प्राग्ज्योतिषपुरींचा नृपनाथ ॥ नरकसुत जो भगदत्त ॥ 
महागजारूढ बलोन्मत्त ॥ बाण वर्षत धांवला ॥१७२॥ 

सोडूनि शशिवदन बाण ॥ भीमाचा स्यंदन केला चूर्ण ॥ 
मग तो वृकोदर गदा घेऊन ॥ नरक सुतावरी धांवला ॥१७३॥ 

कुलालचक्रापरी देख ॥ महाद्विप फेरी तो भगदत्त ॥ 
भीम गजासी आकळीत ॥ परी तो सहसा नाटोपे ॥१७४॥

गदाघायें झोडी वृकोदर ॥ परी कधीं नाटोपे अनिवार ॥ 
जिकडे तळपे कुंती कुमार ॥ पाठीलाग न सोडी ॥१७५॥

अगदी हेच वर्णन ह्या शिल्पात कोरलेले आहे. महाकाय असा सुप्रतीक हत्ती भीमावर त्वेषाने चालून आलाय. खालच्या पॅनलमध्ये कुरळ्या केसांचा बलाढ्य गदाधारी भीम सुप्रतीक हत्तीने आपल्या सोंडेत उचललाय. त्या क्षणी भीम असहाय्य आहे. त्याची गदा हातातून जवळजवळ सुटतेय. त्याचा चेहरा आणि देहबोलीतून त्याची हतबलता कळतेय; पण शेवटी तो अंगी दहा हजार हत्तींचे बळ असलेला भीम आहे. 



त्याच पॅनलमध्ये हत्तीच्या सोंडेत अडकलेल्या भीमाच्या वरच, त्या विळख्यातून सुटून हत्तीवर चढून वर अंबारीत बसलेल्या भगदत्तावर चालून जाणारा भीम दाखवलाय. इथे मात्र त्याच्या देहबोलीत त्वेष आहे, सामर्थ्य आहे. हत्तीचा माहूत एका हातातले शस्त्र उंचावून भीमाचा प्रतिकार करू बघतोय. भगदत्त पाठीमागे अंबारीत राहून भात्यातले बाण धनुष्याला लावतोय. भीमाने त्वेषाने आपली गदा उभारलेली आहे. अत्यंत आवेशमय असे हे भीमाचे शिल्प आहे. खालचा भीम विवश आहे, वरचा भीम वीरश्रीयुक्त आहे; पण भगदत्ताचा हत्ती इतका सामर्थ्यवान असतो की भीमाला मैदान सोडून माघार घ्यावी लागते आणि अर्जुनाला त्याच्या मदतीला धावून यावे लागते. शेजारच्याच पॅनलमध्ये त्वरेने भीमाच्या मदतीला धावून आलेला अर्जुन दाखवलाय. अर्जुन भात्यातून अस्त्र काढतोय. 

मूळ महाभारत कथेमध्ये भगदत्ताचा वध शेवटी अर्जुनच करतो, भीम नव्हे. मग भगदत्त आणि भीम ह्यांचे हे युद्ध इथे दाखवावेसे मंदिर बांधणाऱ्या शिल्पीला का वाटले असेल, हा प्रश्न आम्हा सगळ्यांनाच पडला होता. हा तसा महाभारतातला मुख्य प्रसंगही नव्हे. देगलूरकर सर म्हणाले, की ‘ही शिल्पे सूचक असतात. मंदिर बांधणाऱ्या राजाला/राणीला त्या शिल्पातून त्याच्या आयुष्यातला एखादा महत्त्वाचा प्रसंग सांगायचा असतो.’ मलाही ते पटले. 

घरी परत आल्यानंतर मी हे चेन्नकेशवाचे मंदिर ज्याने बांधले त्या विष्णुवर्धन राजाचा विलियम कोएलो ह्यांनी लिहिलेला इतिहास वाचला. होयसळ राजवंशातील हा सगळ्यात शूर, कर्तबगार राजा. ११०८मध्ये तो सिंहासनावर आला. त्याचे मूळ नाव बिट्टीदेव. तो आधी जैन होता; पण पुढे तो वैष्णव झाला आणि त्याने विष्णुवर्धन हे नाव धारण केले. तो अत्यंत पराक्रमी व कुशल योद्धा होता. त्याने प्रथम चोळ राजांवर आक्रमण करून यश मिळविले व जवळचे तळकाड हे त्यांचे प्रमुख शहर हस्तगत केले. मूळ कावेरी खोऱ्यापुरते सीमित असलेले होयसळ राज्य त्याने कृष्णेपर्यंत नेऊन भिडविले. त्याच्या आधी होयसळ राजे चालुक्यांचे मांडलिक होते; पण विष्णुवर्धन महत्वाकांक्षी होता. त्याला स्वतंत्र व्हायचे होते; पण चालुक्यांचा राजा विक्रमादित्य सहावा हाही शूर होता त्याने विष्णुवर्धनाला मागे रेटले. त्यामुळे त्याला चालुक्यांची सत्ता मान्य करावी लागली. साधारण ह्याच वेळी बेलूरची ही मंदिरे निर्माण केली जात होती. 

कदाचित विष्णुवर्धन भीमाच्या रूपात स्वतःला बघत असेल आणि वयोवृद्ध भागदत्ताच्या रूपात विक्रमादित्याला आणि सुप्रतीक हत्ती म्हणजे होयसळ राज्याच्या मानाने अवाढव्य असलेले तत्कालीन चालुक्य साम्राज्य! भीमाला जशी भागदत्ताच्या हत्तीमुळे युद्धातून तात्पुरती माघार घ्यावी लागली तशी विष्णुवर्धनालाही घ्यावी लागली होती. हे जर लक्षात घेतले तर ह्या शिल्पामागचा संदर्भ लागू शकतो. 

- शेफाली वैद्य 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YUJCCW
Similar Posts
बेल्लूर येथील चेन्नकेशव मंदिर : प्राचीन भारतीय वारसा वैभव कर्नाटकातील बेल्लूर येथील १२व्या शतकात बांधलेल्या चेन्नकेशव मंदिर आणि मंदिर समूहातील काही कोरीव कामांची ही प्रकाशचित्रे!... बसाल्ट ह्या अतिशय कठीण अश्या दगडात अतिशय नाजूक आणि बारकाव्यांसह केलेले अविश्वसनीय कोरीव काम बघणाऱ्याला आश्चर्यचकित करणारे आहे!... आज उपलब्ध असणाऱ्या, स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजीलासुद्धा, हे नाजूक कोरीव काम जमणार नाही
Beautiful artwork at Chennakesava temple Chennakesava temple at Belur, Karnataka What a beautiful artwork!... Kudos to the generations of artists, who put their art and heart in creating this marvel!...
एकाच अखंड दगडातून घडवलेली रुद्रवीणाधारिणीची प्राचीन मूर्ती बेल्लूरच्या चेन्नकेशव मंदिरातली ही एकाच अखंड दगडातून बनवलेली रुद्रवीणाधारिणी. ती मूर्ती, तिची रुद्रवीणा, गळ्यातली माळ, कमरेची आभूषणं, हे सगळं एकाच अखंड दगडामधून कोरून घडवलेलं आहे!
कर्नाटकातलं अप्रतिम लक्ष्मी-नरसिंह मंदिर कर्नाटकातल्या मंड्या जिल्ह्यात होसाहोलालू येथे वसलेलं लक्ष्मी-नरसिंह मंदिर म्हणजे होयसळ शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. या मंदिराची माहिती देत आहेत शेफाली वैद्य...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language